पुणे जिल्हा परिषदेच्या २८ शाळांना अ+ श्रेणीपुरंदरमधील ३ शाळांचा मानाचा तुरा

Photo of author

By Sandhya

28 schools of Pune Zilla Parishad awarded A+ grade, 3 schools in Purandar awarded A+ grade

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या २८ शाळांनी राज्यस्तरीय शाळा गुणवत्ता मूल्यांकनात अ+ श्रेणी मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या वतीने ही मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळेतील पायाभूत सुविधा, सुरक्षित व स्वच्छ वातावरण, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन या निकषांवर शाळांचे मूल्यमापन करण्यात आले.
या यशामध्ये पुरंदर तालुक्यातील मठवाडी, चांबळी आणि कदमवस्ती येथील तीन शाळांचा समावेश असून, ग्रामीण भागातील शाळांनी दर्जेदार शिक्षण देत राज्यस्तरावर आपली छाप पाडली आहे. विशेष म्हणजे या शाळांनी ई-लर्निंग, स्मार्ट टीव्ही/प्रोजेक्टरचा वापर, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ आणि पालक सहभाग या बाबींमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
तालुकानिहाय पाहता खेड – ८, आंबेगाव – ४, भोर – ३, शिरुर – २, बारामती – २, जुन्नर – २, मावळ – २, मुळशी – १ आणि हवेली – १ अशा एकूण २८ शाळांनी अ+ श्रेणी मिळवली आहे. ही संख्या जिल्हा परिषद शाळांमधील वाढत्या गुणवत्तेचे प्रतीक मानली जात आहे.
जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी सांगितले की, “अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. गुणवत्ता वृद्धीच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.”
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील काळात अ+ पेक्षा अधिक उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘विद्यार्थी केंद्रित अध्यापन’, ‘मूल्याधिष्ठित शिक्षण’, ‘क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांवर भर’ तसेच ‘शाळा-समुदाय सहभाग’ या बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून, जिल्हा परिषद शाळांविषयी पालकांचा विश्वासही अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.

पुरंदर तालुक्यातील अ+ श्रेणी मिळवणारी शाळा

(१)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मठवाडी (ता. पुरंदर)

(२)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांबळी (ता. पुरंदर)

(३)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कदमवस्ती (ता. पुरंदर)


पुरंदर तालुक्यात शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण नियोजन, शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षकांच्या बांधिलकीमुळे शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम व परिणामकारक होत आहे. शाळांमध्ये विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, डिजिटल साधनांचा वाढता वापर, नियमित शैक्षणिक आढावा बैठकांमधून प्रगतीचे मूल्यमापन तसेच पालक-शाळा समन्वय या माध्यमातून सकारात्मक बदल घडत आहेत.
विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता कौशल्याधारित, मूल्याधिष्ठित आणि स्पर्धात्मक शिक्षण देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
भविष्यात पुरंदर तालुक्यातील सर्व शाळांनी गुणवत्ता वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करत अधिकाधिक शाळांनी अ+ श्रेणी प्राप्त करावी, अशी अपेक्षा आहे. शिक्षण क्षेत्रातील ही उन्नती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी सर्व शाळांचे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. त्यांनी पुढील काळातही गुणवत्ता वृद्धी, नवकल्पना आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणावर भर देत जिल्हा परिषद शाळांनी राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हे यश केवळ शाळांचे नसून संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने उचललेले हे एक भक्कम पाऊल ठरले आहे.
— श्री. गजानन पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी
पुणे जिल्हा परिषद

Leave a Comment

You cannot copy content of this page