आषाढी वारीपूर्वी सासवड येथे भव्य मॉक ड्रिलचे आयोजनपोलीस, बॉम्ब शोधक, QRT, ATB आणि ड्रोन पथकांचा समन्वय – अतिशय यशस्वी प्रत्यक्षिक

Photo of author

By Sandhya

सासवड (ता. पुरंदर)
सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोपानकाका मंदिर येथे येत्या आषाढी वारी २०२५ पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अतिरेकी हल्ल्याच्या संभाव्य घटनेवर आधारित मॉक ड्रिलचे आयोजन केले. या प्रत्यक्षिकात सासवड पोलीस स्टेशन स्टाफ, बॉम्ब शोधक व नाशक पथक, जलद प्रतिसाद पथक (QRT), दहशतवादी विरोधी पथक (ATB) आणि ड्रोन पथक यांनी संयुक्त सहभाग घेतला.

घटनेची रुपरेषा:
“सोपानकाका मंदिरात दोन संशयित इसम लपून बसले आहेत,” असा गुप्त संदेश नियंत्रण कक्षास प्राप्त होताच सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. ऋषिकेश अधिकारी यांनी त्वरीत कारवाई करत पोलिसांची टीम सक्रिय केली. काही मिनिटांतच पोलीस पथक मंदिर परिसरात दाखल झाले. सर्व भाविकांना शांतपणे व सुरक्षितपणे परिसराबाहेर काढण्यात आले.

संयुक्त कारवाईची रूपरेषा:
घटनेची माहिती मिळताच QRT, बॉम्ब शोधक व नाशक पथक, दहशतवादी विरोधी पथक आणि ड्रोन युनिट घटनास्थळी दाखल झाले. मंदिर परिसर सील करण्यात आला. QRT पथकाने परिसर ताब्यात घेत सर्च ऑपरेशन सुरू केले. तपासादरम्यान मंदिरात दोन अतिरेकी असल्याची खात्री झाली आणि त्यांनी मंदिराजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली असल्याचेही निष्पन्न झाले.

स्फोटक निष्क्रिय करण्याची प्रक्रिया:
बी.डी.डी.एस. (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड) पथकाने संपूर्ण सुरक्षेच्या उपायांसह बॅगची तपासणी केली व वॉटर डिस्टर्बरच्या सहाय्याने बॅग निष्क्रिय केली. अग्निशमन दलाने परिसरात पाण्याचा मारा करत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतिम कारवाई केली.

कार्यवाहीतील मान्यवर अधिकारी व अंमलदार:
या मॉक ड्रिलमध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड उपविभागीय पोलीस अधिकारी मा. दिलीप शिंदे, QRT पथकाचे सपोनि कारंडे, ATB चे सपोनि प्रकाश पवार, बी.डी.डी.एस. चे सपोनि संतोष साळुंके यांच्यासह अनेक अनुभवी अंमलदार सहभागी झाले होते.

प्रमुख अंमलदारांमध्ये सहा. फौजदार राजू जढर, पो.हवा सतीश गेंगजे, गणेश फापाळे, चंद्रशेखर मगर, ड्रोन युनिटचे संदीप जगताप, QRT चे राणा, धायगुडे, अक्षय जावळे, गाडे, भोर, पाकिरे, मुंडे, दहिफळे, शेख, मुळे, बटुळे, OTB चे विशाल गव्हाणे, विशाल भोरडे, रविंद्र जाधव, ओंकार शिंदे यांचा समावेश होता.

संकटजन्य परिस्थितीत जलद प्रतिसाद व व्यवस्थापन:
या मॉक ड्रिलमधून प्रत्येक युनिटची कार्यक्षमता, निर्णयक्षमता आणि समन्वयाचे कौशल्य दिसून आले. कोणतीही परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता सर्व पथकांनी सामूहिक आणि जलद प्रतिसाद देत कारवाई पूर्ण केली.
या प्रत्यक्षिकामुळे आषाढी वारीसाठी प्रशासन किती सज्ज आहे, याचे प्रत्यंतर आले.

निष्कर्ष:
या मॉक ड्रिलमुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा, विशेष पथके आणि सर्व तंत्रसज्जता शंभर टक्के कार्यक्षम असून कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी तातडीने कारवाई करण्यास सक्षम असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page