‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’, असे म्हणत शिवसेनेकडून उद्धव ठाकरेची व्यंगचित्राद्वारे उडवली खिल्ली

Photo of author

By Sandhya

  • रेहमान डकैत थीमद्वारे आदित्य ठाकरेंच्या ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ या वरळीच्या घोषणेचा उडवला फज्जा

‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असे म्हणत शिवसेनेने व्यंगचित्राद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. वरळीमध्ये आज आदित्य ठाकरेंच्या सभेत ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ या नाऱ्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र, शिवसेनेने त्यांच्या या घोषणेचा फज्जा उडवून सध्या चर्चेत असलेल्या ‘रेहमान डकैत’ या धुरंधर सिनेमामधील पात्राचा आधार घेत टीका केली आहे.
मुंबईसह राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच झाली असून राजकीय वातावरण तापण्यासही सुरुवात झाली आहे. यानिमित्तानेच, शिवसेनेनेही २५ वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्या उबाठा गटावर टीका करणारे व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. वरळीमध्ये आज आदित्य ठाकरे ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ अशी घोषणा सभेमध्ये देणार आहेत. मात्र, नेमका त्यांच्या याच घोषणेचा फज्जा शिवसेनेने व्यंंगचित्राद्वारे उडवला. त्यांनी यात धुरंधर सिनेमातील गाजत असलेल्या रेहमान डकैत या पात्राचा आधार घेत उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र काढले आहे. त्यात हे पात्र ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असं म्हणत असून, त्याला घाबरून संजय राऊत व आदित्य ठाकरे खाऊन नव्हे करून म्हणा असे सांगताना दिसत आहेत. गेल्या २५ वर्षांत उबाठा गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली त्यात सव्वा लाख कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आज भाजपकडून झाला असतानाच हे व्यंगचित्र बाहेर आले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र व्हायरल झाले असून अनेक जण उबाठा गटावर टीका करताना दिसत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page