

टीव्हीवरील बहुगुणी अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता फर्मान हैदर सध्या झी टीव्हीवरील नव्या मालिकेत ‘जगद्धात्री’ मध्ये दमदार आणि अॅक्शनने भरलेली भूमिका साकारत आहे. ही मालिका स्त्रीच्या दुहेरी जीवनाची, तिच्या जिद्दीची आणि अंतर्गत सामर्थ्याची प्रभावी कहाणी मांडते. फर्मान यात जगद्धात्रीचा विश्वासू मित्र आणि आयपीएस अधिकारी शिवायची भूमिका साकारत आहे. शिवाय आपल्या वेदना आपल्या विनोदबुद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामागे लपवतो. जगद्धात्री आणि शिवायची साथ ही मैत्री, समानता आणि अव्यक्त शक्तीचे प्रतीक ठरते. या भूमिकेबद्दल बोलताना फर्मान म्हणाला की या मालिकेमुळे त्याचे लहानपणीचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना फर्मान म्हणाला, “लहानपणापासूनच माझे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. पण माझ्या नशिबात अभिनय लिहिलेला होता आणि ‘जगद्धात्री’ मालिकेमुळे माझे ते स्वप्न पडद्यावर जगण्याची संधी मिळाली आहे. शिवायची भूमिका साकारणे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक अनुभव ठरला आहे. यात मला आयपीएस अधिकाऱ्यांचा शिस्तबद्ध आणि निर्धारपूर्ण स्वभाव दाखवता येतो तसेच त्यांच्या तीव्र भावना व्यक्त करता येतात. या भूमिकेचे आणखी एक आकर्षण म्हणजे अॅक्शन! मी जबरदस्त पाठलागाच्या दृश्यांपासून ते दमदार लढाईच्या सीन्सपर्यंत स्वतः सर्व स्टंट्स केले आहेत. हे नक्कीच आव्हानात्मक आहे, पण त्यातून मिळणारा उत्साह आणि जोश मला माझ्या पात्राच्या सामर्थ्याशी आणि त्याच्या आत्म्याशी अधिक जोडतो.”
‘जगद्धात्री’ ही मालिका स्त्रीच्या सामर्थ्याची आणि आत्मशोधाची कहाणी सांगते. या कथेतील नायिका दोन वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये जगते. घरात ती एक शांत, नम्र मुलगी असून जेव्हा जबाबदारी येईल तेव्हा ती एक निडर अंडरकव्हर अधिकारी एजंट जे.डी. बनते. या मुख्य भूमिकेत सोनाक्षी बत्रा झळकत आहे. ती जगद्धात्रीच्या गुंतागुंतीच्या प्रवासाला ताकदीने आणि सुबकपणे साकारते. तिचा प्रवास हा सत्य शोधण्याचा आणि आत्मजागृतीचा आहे, जिथे ती केवळ गुन्ह्यांविरुद्धच नाही, तर स्वतःचा हक्क आणि स्थान मिळवण्यासाठी तिच्या क्षमतेला कमी लेखणाऱ्या समाजाविरुद्धही लढते.
या मालिकेत सयंतानी घोष माया देशमुख ह्या एका प्रभावशाली मीडिया उद्योजिकेची भूमिका साकारत आहे. मायाची प्रबळ इच्छाशक्ती आणि गुंतागुंतीच्या भावना या कथेला अधिक गहिरे बनवतात आणि वेगळे रूप प्रदान करतात.