जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया

Photo of author

By Sandhya

  • जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
  • नदीजोड प्रकल्प संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे गुंतवणूकदार व बँकर्स समवेत चर्चासत्र

मुंबई, दि. १७ :- सिंचन क्षेत्राचा विस्तार, शेती, उद्योग व घरगुती वापरासाठी दीर्घकालीन जल नियोजन, आणि पाण्याचा प्रत्येक थेंब सिंचनासाठी हेच नदीजोड प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोठ्या जलप्रकल्पांमुळे शाश्वत विकास, दुष्काळ नियंत्रण आणि संतुलित प्रगती साध्य होईल असे सांगत, भविष्यात जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया, असे आवाहन जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
राज्यात हाती घेण्यात येत असलेल्या नदीजोड प्रकल्पासंदर्भात गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, जलसंपदा विषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इन्फास्ट्रक्चर कंपनी, बँकर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील जलसंपदा विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चासत्र होत असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने राज्याच्या जलसिंचनामध्ये भरीव वाढ करण्यास प्राधान्य दिले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांत तज्ज्ञ, खासगी भागीदार, वित्तीय संस्था तसेच जनतेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यात उभारण्यात येणारे सर्वच नदीजोड प्रकल्प परिवर्तनकारी ठरतील. या प्रकल्पांमुळे पाणीटंचाई दूर होऊन विकासाचा समतोल साधण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांची आर्थिक संपन्नता होणार आहे. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार आहे. यासोबतच शहरी अर्थव्यवस्था व औद्योगिक वाढीसही चालना मिळेल. पुढील पिढ्यांसाठी पाण्याची उपलब्धता होणार असल्यामुळे त्यांच्यापुढे येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट दूर होणार आहे, असा विश्वास जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, नदीजोड प्रकल्पासाठी आवश्यक परवाने, वित्तपुरवठा, जमीन अधिग्रहण आदि विषय प्राधान्याने सोडवले जातील. या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणाऱ्या हितधारकांकडून नवनवीन कल्पना व सहयोगी उपायांचे स्वागतही करण्यात येईल.
मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आणि जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दमनगंगा- वैतरणा- गोदावरी, नार- पार- गिरणा, दमनगंगा- एकदरे- गोदावरी, वैनगंगा- नळगंगा आणि उल्हास- वैतरणा-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाबाबत माहिती दिली. नदीजोड प्रकल्पासंदर्भातील चर्चासत्रात १३ कंपन्यांच्या २२ प्रतिनिधींनी आणि सहा बँकर्सच्या १५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला .
सह सचिव तथा मुख्य अभियंता प्रसाद नार्वेकर यांनी सादरीकरण केले. तर जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे यांनी आभार मानले.

Leave a Comment

You cannot copy content of this page