

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा जगभर प्रसिद्ध आहे.कोल्हापूर प्रमाणे जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मर्दानी दसरा उत्सवाला राज्यस्तरीय दर्जा शासनाने द्यावा अशी मागणी श्री क्षेत्र खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी समस्त ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी केली.
महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी येथील ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी कोल्हापूरच्या शाही दसरा उत्सवां प्रमाणे जेजुरीच्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा जगभर प्रसिद्ध आहे.राज्य शासनाने या उत्सवाला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा द्यावा यासाठी जेजुरी देवसंस्थानने पुढाकार घ्यावा, खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्यातील दोनशे खांदेकऱ्यांचां ग्रुप विमा देवसंस्थानने काढावा. तसेच सोमवती व दसरा पालखी मार्गाचे शासनाने डांबरीकरण करावे अशी मागणी केली.
दसरा उत्सवासाठी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने जेजुरी गडावरील सर्व मंदिरांना फुलांची सजावट,विद्युत रोषणाई,गडा पासून ते रमण्यात देवभेटी वेळी हवाई फटक्यांची आतषबाजी, तलवार स्पर्धेतील तलवार तोलून धरणे व कसरतीसाठी प्रथम विजेत्याला प्रत्येकी 51 हजार तसेच इतर विजेत्यांना मोठ्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहे.नित्य सेवेकरी वर्गाला पोशाख,मानकरी खांदेकरी यांचा सन्मान,कलावंतांना मानधन,पालखी मार्गांची दुरुस्ती,व खांदेकरी साठी ग्रुप विमा काढण्यात येणार असल्याचे देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले.
कडेपठार खंडोबा मंदिरात या उत्सवानिमित्त विद्युत रोषणाई,रस्त्यांची दुरुस्ती,पाणी आदींची सुविधा कडेपठार देवता लिंग ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मयूर दीडभाई यांनी सांगितले.
जेजुरी व कडेपठार गडावर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडा अंतर्गत विकास कामे सुरू आहेत.यातील अनेक कामे दर्जाहीन आहेत. काही मंदिरात पावसाचे पाणी गळत असून त्यामुळे मंदिरात घान पाणी साठते तसेच नवीन भिंतीना भेगा पडणे,पायऱ्यांचे काम व्यवस्थित झाले नाही. ही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी पुरातत्व विभाग देवसंस्थान व ग्रामस्थांची एकत्रित बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली .
दसरा दिवशी सायंकाळी सहा वाजता श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा सिमोलांघनासाठी जेजुरी गडावरून मार्गस्थ होईल व मध्यरात्री दोन ते अडीच या वेळी रमना येथे देव भेटीचा सोहळा होईल असे या वेळी खंडोबा देवाचे मुख्य इनामदार राजेंद्र पेशवे यांनी सांगितले.
या बैठकीला श्री खंडोबा पालखी सोहळा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी कृष्णा कुदळे,सुधीर गोडसे,गणेश आगलावे,छबन कुदळे,इनामदार राजेंद्र पेशवे,सचिन पेशवे, भागूजी खोमणे पाटील,रोहिदास माळवदकर,राजाभाऊ चौधरी, सुशील राऊत,संतोष खोमणे,शैलेश राऊत,जाफर पानसरे, अनिल झगडे दीपक राऊत सर्व समाजाचे प्रतिनिधी,श्री मार्तंड देवसंस्थान चे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे,विश्वस्त ॲड पांडुरंग थोरवे,पोपट खोमणे,विश्वास पानसे,व्यवस्थापक आशिष बाठे माजी विश्वस्त नितीन राऊत,संदीप जगताप व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.