

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि.२२) काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला. दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी वेणू गोपाल यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या तात्कालीन अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने डॉ.कैलास कदम यांची निवड पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी केली होती.
काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेत असताना कदम यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली. काँग्रेस पक्ष वाढीसाठी तसेच घरोघरी पक्षाचे चिन्ह पोहचवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि आता सोमवारी त्यांनी काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
वेणू गोपाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात कदम यांनी म्हटले आहे की, “मी कैलास महादेव कदम, तुम्ही मला दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रानुसार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदावर काम करीत आहे. परंतु, आज सोमवार, दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मला कार्यमुक्त करावे. ही नम्र विनंती. मी पुढे काँग्रेस चा प्राथमिक सदस्य पदावर काम करणार आहे.”
डॉ. कदम यांनी जरी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला, तरी काँग्रेसचे प्राथमिक सदस्य पदावर काम करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉ. कदम यांनी सांगितले की, मी विद्यार्थी दशेपासून पिंपरी चिंचवड शहरात आणि औद्योगिक पट्ट्यात काँग्रेसचे काम करीत आहे.