तक्रारवाडीच्या सरपंचपदी शरद वाघगावच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलाला सरपंच पदाची संधी

Photo of author

By Sandhya

भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावच्या सरपंचपदी शरद संपतराव वाघ यांची शुक्रवार ( ता.६) रोजी बिनविरोध निवड झाली. सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीकांत मुळे यांनी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलावली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश धुमाळ यांनी शरद वाघ यांच्या सरपंच पदाची सूचना मांडली. त्यास ग्रामपंचायत सदस्या राणीताई काळंगे यांनी अनुमोदन दिले. निर्धारित वेळेत एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत मुळे यांनी शरद वाघ यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
शरद वाघ यांचे वडील संपतराव हरिभाऊ वाघ हे १९८९ ते१९९५ या सात वर्षांच्या कालावधीत सरपंच भुषवले होते त्यानंतर २००० ते २००५ या पाच वर्षाच्या कालावधीत सुद्धा उपसरपंच म्हणून कामकाज केले होते. त्याचबरोबर १९८० ते २००५ या २५ वर्षाच्या कालावधीत सलग ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत होते. तक्रारवाडी गावच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलाला सरपंच होण्याचा बहुमान शरद वाघ यांच्या रूपाने मिळाला आहे. निवडीनंतर बोलताना नूतन सरपंच शरद वाघ यांनी सांगितले की, वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पेलत गावचा सामाजिक सोलोखा राखत गावाचे गावपण टिकवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page