



सासवड, ता. २२: “या या दिव्याच्या घाटात, माऊली चालती थाटात” या रचनेला सार्थ करत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांच्या माऊली नामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात दिवे घाटाची अवघड चढण यशस्वीपणे पूर्ण करून रविवारी (दि. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास पुरंदर तालुक्यात दाखल झाला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवला. घाटाच्या शेवटच्या टप्प्यात पुरंदरकरांच्या वतीने माऊलींच्या पालखी रथाचे टाळ्यांच्या कडकडाटात उत्साहात स्वागत करण्यात आलं.
पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते. वडकी येथील विसाव्याच्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पाचच्या सुमारास पालखी सोहळ्याने दिवे घाट चढायला सुरुवात केली. ठीक सहा वाजता घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी सव्वासहा वाजता पालखी विसावली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, दादा जाधवराव, बाबा जाधवराव, उपविभागीय अधिकारी वर्षां लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोतीश्रीश्रीमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांसह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, झेंडेवाडीसह दिवे पंचक्रोशीतील गावोगावचे सरपंच, सदस्य आदी मान्यवरांनी सोहळ्याचं स्वागत केलं. झेंडेवाडीनंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी सोहळ्याचं स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला.
माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडीबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या चार बैलजोड्यांनीही रथ ओढण्यास मदत केली. हा सोहळा घाटाच्या अंतिम टप्प्यात असताना घाटावरील भाविकांनी हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. यावेळी माऊली नामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. माऊलींचा पालखी रथ शेवटचा टप्पा ओलांडून पुरंदरच्या हद्दीत प्रवेश करताना “माऊली… माऊली…” नामाचा जयघोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं. यानंतर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी काहीवेळ हा सोहळा विश्रांतीसाठी थांबला. यावेळी हजारो वारकऱ्यांनी घाटमाथ्यावर काहीवेळ विश्रांती घेतली.
पुढील मार्गावर विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी पाणी, चहा, फराळाचं साहित्य वाटलं जात होतं. तरुण, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था पाहत होते. अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषधांची, पाणीपुरवठ्याची सोय केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यात तरुणाईचं प्रमाण लक्षणीय दिसत होतं.
अवघड दिवे घाटाची नागमोडी वळणं आणि त्यातून वैष्णवांच्या भाऊगर्दीत माऊलींचा रथ आणि त्याला जोडलेल्या बैलगाड्या, हा नयनरम्य सोहळा कॅमेरात कैद करण्यासाठी दरवर्षी हजारो नागरिक, भाविक, छायाचित्रकार घाटमाथ्यावर उपस्थित असतात. यंदा मात्र घाटाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे आणि मे पासून सुरू असलेल्या पावसामुळे दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटात जाण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला होता.