
पिंपरी -निगडी प्राधिकरण परिसरातील ज्येष्ठ नागरिकाच्या घरात दरोडा टाकून सुमारे 6.15 लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, कार, मोबाईल, बनावट नंबर प्लेट, वॉकी-टॉकी अशा महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
१९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी, पाच जणांच्या टोळीने निगडीतील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बंगल्यावर धाड टाकून त्यांचे हातपाय बांधले व तोंडाला चिकटपट्टी लावून कपाटांतील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुरेश लादुराम ढाका (रा. राजस्थान) याला जयपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर महिपाल बिष्णोई (रा. वडगाव मावळ) यासही ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ, मारुती स्विफ्ट कार, मोबाईल, वॉकी-टॉकी आणि बनावट नंबर प्लेट हस्तगत करण्यात आल्या आहेत. या टोळीवर यापूर्वीही राजस्थान आणि गुजरातमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.