पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज

Photo of author

By Sandhya

२२ कक्षांची स्थापना, ४०१२ मतदान केंद्रे, २३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती; आदर्श आचारसंहिता लागू

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततापूर्ण पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरासाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या मदतीसाठी १५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (१), १५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (२) आणि १५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (३) यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांची कार्यालये निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक कामकाजासाठी एकूण २२ स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्यासाठी १५ नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरही २२ कक्षांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी सुलभ सुविधा

उमेदवारांना महापालिकेतील विविध विभागांकडील ना-हरकत व थकबाकी प्रमाणपत्रे सहज मिळावीत, यासाठी पुणे महापालिकेने संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांना एकाच ठिकाणी अर्ज करून किंवा ऑनलाईन पद्धतीने ही प्रमाणपत्रे प्राप्त करता येणार आहेत. तसेच प्रचारासाठी आवश्यक असलेले वाहन परवाना, तात्पुरते प्रचार कार्यालय, कोपरा सभा, जाहीर सभा यांसारख्या परवान्यांसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होण्यासाठी संगणक प्रणालीविषयक कार्यवाही सुरू आहे.

कायदा व सुव्यवस्था व मतदान व्यवस्था

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १६० पोलिसांची नियुक्ती करण्यात येत असून, त्याबाबत पोलिस विभागास कळविण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २, ३) मिळून सुमारे २३ हजार कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत.
शहरातील ४१ प्रभागांमध्ये एकूण ४०१२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, सर्व ठिकाणी स्ट्राँग रूम, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्रांची व्यवस्था संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. अंतिम मतदार यादीच्या आधारे मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

आदर्श आचारसंहिता लागू

पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी दि. १५ डिसेंबर २०२५ पासून संपूर्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हरकती व तक्रारी नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आचारसंहिता भंगाबाबत तक्रार असल्यास संबंधित क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुणे मनपा मुख्य भवन, नवीन इमारत, दुसरा मजला येथे स्थापन करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहिता समन्वयक कक्षाकडे दूरध्वनी व ई-मेलद्वारेही तक्रारी दाखल करता येणार आहेत.

पुणे महापालिका निवडणूक २०२५-२६ शांततापूर्ण, पारदर्शक व लोकशाही मूल्यांनुसार पार पडावी, यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page