पुरंदर उपसा सिंचन योजनेची अर्धवट कामे सहा महिन्यांत पूर्ण करणार… जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही

Photo of author

By Sandhya

​पुरंदर तालुक्यातील जिरायती पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या पुरंदर उपसा आणि जनाई उपसा जलसिंचन योजनांची सर्व प्रलंबित कामे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार असून, या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा कधीही दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही, अशी भक्कम व्यवस्था सरकार करणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. वाघापूर चौफुला येथे आयोजित शेतकरी संवाद बैठकीत ते बोलत होते.
वाघापूर चौफुला येथे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, गंगाराम जगदाळे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, संजय निगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत राऊत, संदीप फडतरे, गणेश जगताप यांसह भाजपचे जिल्हा व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, उमेदवार आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
​यावेळी सविस्तर माहिती देताना नामदार विखे-पाटील म्हणाले की, पुरंदर उपसा योजना तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून येत्या २ ते ३ दिवसांत या योजनेतून पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही योजना भविष्यात पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालेल अशी व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून विजेचा खर्च वाचून शेतकऱ्यांना शाश्वत फायदा होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि निधी तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेतही भाजपची सत्ता असणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
​नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना विखे-पाटील यांनी स्पष्ट केले की, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते पाणी नदीत न सोडण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. यासोबतच नदीकाठावरील गावांमध्येही जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील पाण्याचे आरोग्य जपले जाईल.
याप्रसंगी पी. एस. मेमाणे, कैलास कामथे, रवी फुले, गोरख खेडेकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी योजनांच्या दुरवस्थेबाबत मंत्र्यांकडे तक्रारी मांडल्या. “योजना दुरुस्तीच्या नावाखाली सतत बंद असते. जलवाहिन्या फुटणे, एअर वॉल्व्ह खराब असणे आणि निवडणुकीपुरते पाणी सोडले जाणे यामुळे सर्व लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही,” अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. यावर विखे-पाटील यांनी येत्या २-३ दिवसांत पाणी सोडण्याचे आणि तांत्रिक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी ​आमदार राहुल कुल यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुळशीचे १० टीएमसी पाणी मुळा-मुठेत टाकल्यास त्याचा मोठा फायदा स्थानिक योजनांना होईल. रिंगरोड, पालखी मार्ग आणि जेजुरी विकास आराखड्यामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.​
माजी आमदार संजय जगताप यांनी, पुरंदर-जनाई योजनेवरून सर्वसामान्यांची अडवणूक केली जाते. पाण्यासाठी कोणापुढे झुकावे लागू नये, यासाठी ही कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. भाजपाच्या उच्चशिक्षित आणि जनतेतील उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.​
माजी आमदार अशोक टेकवडे यांनी, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची व नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्प करण्याची मागणी त्यांनी केली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून दत्तात्रय बडदे, अंबिका शिंदे, निलेश कुदळे, अमृत जाधव यांसह अनेकांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
​यावेळी जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिव्या जगदाळे, अजय इंगळे तसेच पंचायत समिती उमेदवार ललिता कटके, देविदास कामथे, माऊली यादव, कैलास जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत संदीप कटके यांनी, प्रास्ताविक संभाजी काळाणे यांनी तर सूत्रसंचालन विकास इंदलकर यांनी केले तर महादेव शेंडकर यांनी आभार मानले. या संवाद बैठकीला परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

​पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये नागरिकांनी विकासाला साथ देत भाजपला मोठे यश दिले आहे. तोच इतिहास आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये घडवायचा आहे, असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. देशाच्या अर्थसंकल्पात युवक, महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून भारतीय अर्थव्यवस्थेला आता नवी गती मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून हक्काचे पाणी द्या : संजय जगताप
​”पुरंदर आणि जनाई उपसा जलसिंचन योजना हा या भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने, ‘मत दिले तरच पाणी’ अशी भूमिका घेऊन आजवर सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले आहे. गावांचा डोंगराकडील भाग आणि नदीच्या दक्षिणेकडील भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. हे राजकारण थांबवून वंचित भागापर्यंत जलवाहिनी नेणे आणि अर्धवट कामे पूर्ण करणे ही काळाची गरज आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपा पुरंदरचा शेतकरी सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page