

जालना जिल्ह्यातील शेळगाव इथल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री लोढा यांनी केली पाहणी
नियम शिथिल करून तातडीची मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश
अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आज जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेळगावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे यावेळी मंत्री लोढा यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना तातडीची तसेच पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत. त्यांच्या निर्देशानुसार मंत्रिमंडळातील सदस्य राज्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेत आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही ही शेळगाव इथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर त्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना नियम शिथिल करून शेतकऱ्यांना तातडीची मदत त्वरित देण्याचे निर्देश दिले. महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून शासनाला नुकसानीचा अहवाल द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल, असे यावेळी लोढा म्हणाले. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा. वाहून गेलेली शेती, नष्ट झालेले पीक, मृत्युमुखी पडलेली जनावरे, विहिरीत आलेला गाळ या सर्व गोष्टींचे पंचनामे करा, असे आदेश मंत्री लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अतिवृष्टीने शेळगाव आणि इतर भागातील पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. त्याठिकाणी रस्ते,पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मंत्री लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस प्रयत्नशील असून दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना मदत मिळेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे भागाची पाहणी करण्यापूर्वी मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला आहे. पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हा देणगी धनादेश दिला आहे. गेल्या काही काळापासून मराठवाडा, नांदेड, जालना, बीड आणि सोलापूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतीत आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री लोढा यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले असल्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटले आहे.