
घातक हत्यारांनी तीस ते पस्तीस वर्षे वय असलेल्या एका अनोळखी तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण लगतच्या बिरदवडी गावच्या हद्दीत सोमवारी (दि.१२) हा प्रकार उघडकीस आला. प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अधिक माहिती अशी की, चाकण एमआयडीसीतील बिरदवडी येथील जमीन गट नं.३२ मध्ये मोकळ्या जागेत एका तीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर इसमाचा कुणीतरी अज्ञात इसमाने कशाच्या तरी अज्ञात कारणावरून दगडाने अथवा घातक हत्याराने तोंडावर जोरदार मारहाण करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज येथील पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, मृत इसमाची अद्याप ओळख पटली नसून, तो चाकण परिसरातील आहे की बाहेरील, याबाबत तपास सुरू आहे. घटना स्थळाच्या आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, स्थानिक नागरिकांकडून माहिती घेणे तसेच तांत्रिक तपास चाकण पोलिसां कडून सुरू आहे. ही घटना पूर्वनियोजित हत्या आहे की, इतर कोणत्या कारणांतून घडली, याचा शोध पोलीस घेत असून, खुनामागील नेमका हेतू आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत.
या घटनेमुळे बिरदवडी व या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होऊ लागली आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.