


चाकण – आंबेठाण रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच दुचाकीवरून जाणारे २ तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३०) घडली आहे. हे दोन्ही तरुण कॉम्पुटर क्लास साठी चाकण येथे जात असताना सदरचा भीषण अपघात घडला आहे.
सोहम उल्हास कडुसकर ( वय १७) व सूजय दिलीप कडूसकर (वय १७, दोघेही रा. कोरेगाव, ता.खेड, जि. पुणे ) अशी या अपघातात ठार झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रक चालक गणेश वसुदेव मायकर (वय – ३० वर्ष, रा. वडवणी, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार चाकण आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी फाटा (ता. खेड) ते दवणेमळा दरम्यान दुचाकीवरून जात असताना आंबेठाण बाजूकडून चाकण बाजूकडे निघालेल्या भरधाव ट्रकची या तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. तत्काळ त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताची माहिती मिळतात कोरेगाव येथील नागरिकांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. आपल्या आई वडिलांना एकुलते एक असलेल्या या दोन्ही तरुणांनी नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन सध्या ते कॉम्पुटरच्या क्लासला जात होते.
मात्र, शुक्रवारी काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दोन्ही तरुणांच्या मागे आई – वडील आणि बहिण असा परिवार आहे. चाकण पोलिसांनी यातील ट्रक चालकास अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, अवजड वाहतूक या रस्त्याने वाढल्याने वाहन धारकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. या भागातील रस्त्यांची अवस्था व भरधाव अवजड वाहतूक यामुळे अपघात वाढले असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.