

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ “माई म्हणजे ममतेचा अथांग झरा, मुलांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला, व्याख्यानं दिली, प्रेरणा दिली. अनेक संस्था मुलांना फक्त जेवण-निवास देतात; पण माईंचे व्हिजन खूप मोठे होते शिक्षण देणे, स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांच्या विवाहाची जबाबदारी सांभाळणे, माईंनी एक क्षणही मुलांना वाऱ्यावर सोडले नाही. माई खऱ्या अर्थाने ‘आई’ होत्या.” ममता बाल सदन हे माईंच्या ममतेने आणि संस्कारांनी घडवलेले खरे ‘माहेरघर’ आहे असे प्रतिपादन आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी केले.
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या जन्मदिनानिमित्त आणि बालदिनाच्या दुहेरी आनंदसोहळ्याच्या निमित्ताने ममता बाल सदन बालगृह, कुंभारवळण येथे माईंच्या स्मृतींना साजेशा उत्सवाचा भव्य व भावनिक कार्यक्रम अत्यंत उत्कट वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रमुख अतिथी म्हणून दैनिक पुण्यनगरी चे संपादक श्रीकांत साबळे, सत्कारमूर्ती दत्ता भोसले, स्टेट बँकेचे अध्यक्ष निखिल वर्तक, ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, ममता सपकाळ, विनय सपकाळ उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना डॉ. नितीन वाघमोडे यांनी मनापासून व्यक्त केलेले शब्द उपस्थितांच्या मनाला भावून गेले. ते म्हणाले, “माईंचा वाढदिवस आणि बालदिन एका दिवशी साजरा होणे हा ईश्वरी योगायोगच आहे. कदाचित देवानेच माईंच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा दिवस एकत्र जुळवून आणला असावा.” माईंच्या कार्याची आठवण काढताना ते भावूक झाले. भावनिक स्वरात त्यांनी एक आठवणही जागी केली, “माझी माईंशी कधी भेट झाली नाही, बोलणेही झाले नाही. पण माईंना पद्मश्री मिळाल्याची बातमी ऐकली त्या क्षणी मला जे समाधान, आनंद वाटला, तो कधीही विसरू शकत नाही.” डॉ. वाघमोडे यांनी मुलींना प्रोत्साहन देत अतिशय मनापासून एक आश्वासक शब्द दिला, “तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) तयारी करायची असेल तर मला जरूर कळवा. पुणे किंवा दिल्लीला जावे लागले तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन.” त्यांच्या या आश्वासक, प्रेमळ आणि करुणेने भरलेल्या शब्दांनी संपूर्ण सभागृहात भावनिक आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ममता सपकाळ, दिपक गायकवाड, दत्ता भोसले, निखिल वर्तक यांची भाषणे झालीत. त्यांच्या भाषणातून माईंच्या आठवणी जिवंत झाल्या. माईंच्या स्मृती, त्यांच्या ममतेचा सुगंध आणि त्यांच्या कार्याचा प्रकाश यामुळे हा उत्सव केवळ कार्यक्रम न राहता, एक संवेदनशील, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्शून जाणारा सोहळा ठरला. कार्यक्रमात मान्यवर अतिथींचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह भेट देऊन स्वागत करण्यात आले. चिमुकल्या मुलींनी कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, नृत्य, नाट्य, गीत, आणि कला प्रदर्शनाद्वारे आपली कला गुण सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीत आणि माईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद व महिला यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अधीक्षिका स्मिता पानसरे, संचालन मुकेश चौधरी, सारिका कुंजीर व मिनल सपकाळ यांनी केले. सोलापूरमधील अवली सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोसले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या मृत व्यक्तींचे विनामूल्य अंत्यसंस्कार करून मानवी सेवेचे अनोखे उदाहरण घातले आहे. त्यांच्या योगदानासाठी माईंच्या संस्थेने आयकर आयुक्त डॉ.नितीन वाघमोडे यांच्या हस्ते आणि संपादक श्रीकांत साबळे यांच्या उपस्थितीत दत्ता निवृत्ती भोसले यांना “माहेरचा सन्मान” देऊन गौरव केला. बालदिन सोहळा, माईंचा जन्मदिन आणि जानवी हिच्या वाढ दिवसाचे औचित्य असे तिहेरी संगमातून मुलींनी मोठ्या आनंदाने केक कट केला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अधीक्षिका स्मिता पानसरे, सुजाता गायकवाड, संजय गायकवाड, गोपाल गायकवाड, मंजू गायकवाड, ज्योती गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, प्रसन्न गायकवाड, पवन गायकवाड, रितेश जांभूळकर, मोनिका क्षीरसागर, संगीता कणसे, रवी ओव्हळ, नाना कुंभारकर, यांच्यासह समस्त कर्मचारी वृंद आणि मुलींनी अथक परिश्रम घेतले.
‘मुलगीच खरा वंशाचा दिवा’ – श्रीकांत साबळे
“पुणे शहरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. संघर्ष कोणाचा अपरिचित नाही. हातावर पोट घेऊन आयुष्य जगणारे आई-वडील आपल्या लेकरांसाठी ज्या त्यागाची होळी करतात, त्याची जाणीव या मुलांना आहे. म्हणूनच ही मुलं कठोर परिश्रम करून अधिकारी बनतात, घरचे नाव उज्वल करतात.” समाजातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मनातील वेदना व्यक्त केली. “पूर्वी ‘मुलगाच वंशाचा दिवा’ अशी समजूत होती. काळ बदलला आणि आता मुलगी देखील तितकाच उजेड देऊ पाहत आहे. ‘मुलगीच खरा वंशाचा दिवा’ आहे असं चित्र दिसतेय. आज पुण्यातला काही तरुण वर्ग हातात कोयता घेऊन रस्त्यावर फिरताना दिसतात, हे पाहून मनाला चटका लागतो. मुलींनो तुम्ही इच्छाशक्ती जागी ठेवा, ध्येयासोबत निष्ठा ठेवा. संघर्षातून जगण्याचा आनंदच वेगळा असतो. तुमच्या मेहनतीला नक्कीच यशाचे सोनं लागेल,” असा ठाम विश्वास दैनिक पुण्यनगरी चे संपादक श्रीकांत साबळे यांनी व्यक्त केला.