माऊली माऊली’ च्या गजरात वरुणराजाच्या उपस्थितीत माऊलींच परतीच निरा स्नान संपन्न

Photo of author

By Sandhya

वारकऱ्यांनी घेतला माऊलींच्या पादुकांच्या स्पर्श दर्शनाचा लाभ

बारामती दि. 15

पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला. पुणे जिल्ह्यातील निरा नदीकाठच्या नीरा शहरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याच आगमन आज सकाळी नऊ वाजता झाले.  त्यापूर्वी निरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना परतीच स्नान घालण्यात आलं... " माऊली माऊलीचा" गजर करत  वरुणराजाच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घालण्यात आलं. यानंतर हा पालखी सोहळा   दुपारच्या विसाव्यासाठी  नीरा येथील विठ्ठल मंदिरात विसावला.

पंढरपूरहून पुन्हा अलंकापुरीकडे निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काल रात्री सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे विसरला होता. आज सकाळी हा सोहळा पुणे जिल्ह्यातील वाल्मीकाची नगरी असलेल्या वाल्हे नगरीतील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. त्यापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालकांना नीरा नदी काठावर परतीचे स्नान घालण्यात आले.यानंतर नीरा नगरीमध्ये नीरा ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्हे येथे असणार आहे. तर उद्याचा मुक्काम संत सोपानकाकांची नगरी असलेल्या सासवड येथे असणार आहे.

वारकऱ्यांना स्पर्श दर्शनाची परंपरा

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये निरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतिच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते. माऊलींच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापुढे आणि रथा मागे चालणाऱ्या वारकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणी माऊलींच्या पादुका नेऊन त्यांना स्पर्श दर्शन देण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी या वारकऱ्यांना या स्पर्श दर्शनाचा लाभ देण्यात आला नव्हता.त्यामुळे वारकऱ्यांनी माऊलींचा रथ अडवला होता… मात्र यावर्षी कोणताही वाद-विवाद तंटा न होता वारकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन मिळाले आणि वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला….निरा नदित पादुकांच्या स्नानानंतर सोहळा मालकांनी प्रथम रथा मागील व नंतर रथा पुढील विणेकऱ्यांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांन माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन दिले. यानंतर वारकऱ्यांनी पुन्हा एकदा “माऊली माऊली” चा गजर करत माऊलींच्या या मार्गावर नतमस्तक होत पायी चालण्यास सुरुवात केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page