
खालापूर – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज, शनिवार (दि. २४ मे) रोजी दुपारी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी असल्याने द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या अधिक होती. दरम्यान द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ३७ म्हणजेच खोपोली फुडमॉल जवळ दुपारी चारच्या सुमारास वाहतूक काही कारणास्तव थांबली होती, त्याचवेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक ट्रेलर भरधाव वेगाने आला. या ट्रेलरने इर्टिगा कारला धडक दिली. नंतर सियाझ कार, ह्युंदायी कार आणि बसला ठोकर दिली. त्यानंतर एका स्विफ्ट कारला पाठीमागून जोराची धडक दिली, तेव्हा ही स्विफ्ट कार समोरील बसला जाऊन धडकली.