
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसरात होणाऱ्या विजयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलिसांकडून बुधवार (दि.३१ डिसेंबर ) ते १ जानेवारी या कालावधीत शहर व ग्रामीण भागातील प्रमुख महामार्गांवरील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
चाकण, शिक्रापूर व वाघोली या प्रमुख मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. चाकण, शिक्रापूर व शिरूर मार्गे चाकण – अहमदनगर मार्गावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. वर्दळीच्या ठिकाणी मुख्यतः वाहतूकीत बदल केला आहे.
चाकण, शिक्रापूर व शिरूर मार्ग हा मार्ग फक्त अत्यावश्यक सेवांसाठी खुला राहणार असून, इतर वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
वाघोली चौक, पेरणे फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक या ठिकाणांहून भीमा कोरेगावकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
मुंबई, पुणे महामार्गावरून अहमदनगरकडे जाणारी वाहतूक ही तळेगाव, नाशिक फाटा, शिक्रापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.
नगरकडून पुण्याकडे येणारी वाहने शिक्रापूर, चाकण–तळेगाव मार्गे वळविण्यात येतील. विशेष करून चाकण – शिक्रापूर आणि शिक्रापूर – चाकण अशी दोन्ही बाजूने वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गांवर फक्त मानवंदनेसाठी जाणारी बसची वाहतूक सुरळीत राहील. तर आळंदी, मरकळ व लोणीकंद मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग ठेवला आहे. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक महाळुंगे इंगळे, वासुलीफाटा, बिरदवडी, रोहकल फाटा, खेड, मंचर नारायणगाव, आळेफाटा मार्गे जातील. तर हलकी वाहने चाकण, खेड, पाबळमार्गे शिरूरला सोडली जातील.
चाकण, महाळुंगे इंगळे व मरकळ औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहतूक या काळात बंद असणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून मरकळ मार्गे येणारी वाहतूक कोयाळी मार्गे चाकणकडे वळवण्यात येत आहे. सोळू, धानोरे भागातील जड वाहने याच मार्गाने जातील. तर च-होली, वडमुखवाडी, आळंदी देहूफाटा भागातून येणारी जड अवजड वाहने मोशी आणि अलंकापुरम चौक मार्गे पुणे – नाशिक महामार्गांवर वळवली जाणार आहेत. खासगी वाहने सकाळी ठरावीक वेळेतच भीमा कोरेगाव परिसरात प्रवेश करू शकतील. विजयस्तंभ परिसरात वाहनतळ मर्यादित ठेवण्यात आले असून, वाहने नियोजित पार्किंगमध्येच उभी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन सेवांना सूट दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस वाहने व अत्यावश्यक सेवा या वाहतूक बदलांतून वगळण्यात आल्या आहेत. त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे पोलीस उपायक्त विवेक पाटील यांनी स्पष्ट केले. वाहतूक पोलिसांनी नागरिक, भाविक व वाहनचालकांना निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे, नियमांचे पालन करण्याचे तसेच अनावश्यक वाहने घेऊन भीमा कोरेगाव परिसरात येऊ नये, असे आवाहन केले आहे. वाहतूक बदलांबाबत माहिती फलक, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व मार्गदर्शन पथके रवाना करण्यात आली आहेत.