
शिरुर तालुक्यात सोमवार (दि १५) रोजी मध्यरात्रीपासुन ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे ओढे, नाले, पाझर तलाव तुडुंब भरुन वाहू लागल्याने अनेक ठिकाणी छोटे पुल पाण्याखाली गेले. तर या पाऊसाने कांदा तसेच बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
शिरुर तालुक्याच्या सर्वच भागात सोमवार (दि १५) रोजी मध्यरात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरु झाला. सलग काही तास हा पाऊस पडत होता. त्यामुळे ढगफुटी तर झाली नाही ना…? अशी भिती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शिरुरच्या पुर्व भागातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी-भोसेवाडी हा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना डेअरीवर दुध घालण्यासाठी पाण्यातुन दोरीच्या साह्याने चालत वाहत्या पाण्यात जीव धोक्यात घालत वाट काढावी लागली.
तर मुसळधार पाऊसाने मोटेवाडी येथील पाझर तलाव तुडुंब भरल्यामुळे या तलावाच्या खालच्या बाजूस असलेला निमोणे-शिरुर रस्त्यावरील छोटा पुल पाण्याखाली गेल्याने अनेक दुचाकी-चारचाकी वाहन चालकांना नाईलाजाने स्वतःच्या गाड्या अंदाजे ३ ते ४ फुट खोल वाहत असलेल्या पाण्यात घालाव्या लागल्या. त्यामुळे या रस्त्यावर पुल उभारावा अशी आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली असल्याचे मोटेवाडीचे सरपंच लालासो कोल्हे यांनी केली आहे.