


पालिकेचे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम,
उद्यानच नसल्याने स्थानिकांचा कोंडला श्वास
गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या कळससारख्या मध्यमवर्गीय भागात पालिका उद्यान विभागाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिकांना अनेक वर्षापासून उद्यानाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आल्याने पालिका ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पालिका उद्यान अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील बहुतांश प्रमाणात अनेक उद्याने धूळखात पडून समस्यांच्या विळख्यात अडकले असले तरी पण स्थानिक नागरिक अशा उद्यानात नाईलाजास्तव जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र येरवडाश्री क्षेत्र आळंदी मार्गावर कळस हे गाव वसलेले असून या गावाला प्रामुख्याने राजकीय वसा लाभलेला असल्याने याकडे प्रामुख्याने मध्यमवर्गीय यांच्यासह उच्चभ्रू सोसायटीचा परिसर म्हणून पाहिले जात आहे.त्यामुळे इतर शहराप्रमाणे या परिसराकडे स्थानिक बिल्डरांनी लक्ष केंद्रीत करून टोलेजंग इमारती उभारल्या आहेत.त्यामुळे येथील लोकसंख्येत देखील भर पडली आहे.या गावाला राजकीय नेत्यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने सर्वसुखसुविधा पुरविण्यात आल्याने येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येते. मात्र अठ्ठावीस वर्षांपूर्वी पालिकेत समावेश करण्यात आलेल्या या भागाला मुख्य समस्या जाणवते ती म्हणजे उद्यानाची परिसरात गेल्या अनेक वर्षापासून उद्यानच नसल्याने स्थानिकांमध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या कामासंदर्भात शंका उपस्थित करून नाराजी पसरली आहे.कळसविश्रांतवाडी मार्गावर पालिका निधीतून दोन ते अडीच गुंठ्यांत या ठिकाणी मैदान उभारून त्यास चिमाजी धापटे असे नामकरण करण्यात आले आहे.पण या ठिकाणी उद्यान विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पदपथ,लहान मुलांना खेळणी बसविण्यात न आल्याने ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.विशेष करून या मैदानाला बारा ही महिने टाळे ठोकले गेल्याने लहान मुलांना परिसरात खेळण्यासाठी उद्यान नसल्याने नाईलाजास्तव ज्येष्ठ नागरिकांसह अशा मुलांना खेळाचा आनंद लुटण्यासाठी विश्रांतवाडी अथवा येरवडा या भागात तीन ते चार किमी अंतर जाण्याची वेळ येत आहे.परिसरात उद्यान नसले तरी पण पालिकेच्या नियमानुसार येथे मैदानाबाहेर सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे असताना येथे रखवालदारच नेमण्यात न आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.सर्वसामान्य नागरिक हा पालिकेचा लाखो रुपयांचा कर भरत असताना देखील नागरिकांना भोंगळ कारभारास सामोरे जाण्याची वेळ येऊन मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.एखाद्या नागरिकांकडून जर कर भरणे चुकले तर त्यांच्या घरावर ताबडतोब बुलडोझर फिरविण्याचे काम पालिकेकडून केले जात असताना दुसरीकडे मात्र येथील नागरिकांना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येत असेल तर यासारखी शोकांतिका दुसरी कोणती असू शकते.
यासंदर्भात अनेकदा स्थानिक नागरिकांकडून परिसरात उत्कृष्ट असे उद्यान व्हावे जेणे करून सगळ्यांना याचा लाभ मिळेल.याबाबत वारंवार मागणी करून देखील अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करण्याऐवजी जनतेला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांच्या मुख्य समस्येकडे पाठ फिरविल्यामुळे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून उद्यानापासून वंचित राहिले असून उद्यानासाठी जागा उपलब्ध नसून जागा मिळाल्यावर उद्यानासाठी प्रस्ताव टाकण्याचा दावा अधिकाऱ्याकडून देण्यात येत असल्याने त्यांच्या मिळणाऱ्या या उत्तरामुळे स्थानिक नागरिक संभ्रमात पडले आहे.त्यामुळे ज्या उद्यानाची गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिक प्रतीक्षा करत आहे.त्या उद्यानाचे कळसकरांचे असलेले स्वप्न साकार होणार की,नाही याचे उत्तर मात्र परिसरात उद्यान नसल्याने याची वाट अजून किती वर्षे पाहावी लागणार याचे उत्तर ना?अधिकाऱ्याकडे आहे,ना?राजकीय नेत्यांकडे त्यामुळे स्थानिक नागरिकांचे असलेले उद्यानाचे स्वप्न लवकर साकार होण्यासाठी अधिकारी यांच्यासह स्थानिक नेत्यांनी देखील प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित गाव हे पालिकेत समावेश होऊन अनेक वर्षाचा कालवधी लोटला आहे.विशेष करून या गावच्या पाठीमागून अनेक गावांचा पालिकेत समावेश झाल्यावर पालिकेकडून सुविधा पुरविण्यात आल्या असताना येथे अद्याप ही उद्यान न उभारल्याने आश्चर्य व्यक्त होऊन अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार उजेडात आला आहे.__