अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा ३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार-  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

Photo of author

By Sandhya


 
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत अतिदुर्गम भागात नव्याने ३८ अंगणवाड्या सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी मान्यता दिलेल्या १४५ अंगणवाड्या बांधून पुर्ण झाल्या असून, या अंगणवाड्यांच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील बालके आणि गरोदर स्त्रियांना पोषण आहार व आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. अतिदुर्गत भागात अंगणवाडी सुरू करण्यासाठी लोकसंख्येचे निकष शिथिल करण्यात आले असून, १०० लोकसंख्या असलेल्या भागात अंगणवाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अंगणवाड्यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत राज्यातील दुर्बल आदिवासी गटात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ३८ अंगणवाडी केंद्रात एक अंगणवाडी सेविका, एक मदतनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या हिश्यातून मानधन, प्रशासकीय खर्च, पोषण आहार, अंगणवाडी भाडे, गणवेश प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी बांधलेल्या १४५ आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या ३८ अशा एकूण १८३ अंणवाड्या गडचिरोली, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, ठाणे, यवतमाळ या जिल्ह्यात सुरू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी  यावेळी दिली..

Leave a Comment

You cannot copy content of this page