
राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा घेतला.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.’ कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुन्यांमध्ये अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार ‘निकोटिन’ पॉझिटिव्ह आढळल्याने शासनाने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाले आहे. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपयांचा साठा जप्त करून कंपनी सील करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३(५), १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार (कलम ३०, २६, २७, ५९) नुसार आरोपींविरुद्ध अनिल कुमार चौहान, असिफ फाजलानी, फैजल फाजलानी, मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ‘अफजल’ ब्रँडच्या हुक्का नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटिनचे प्रमाण आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी’ या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता.