

पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील कात्रज येथून झोपेतून उचलून नेलेल्या केवळ २ वर्षांच्या चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन व गुन्हे शाखेच्या एकत्रित पथकाने केली असून, या प्रकरणात एकूण पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीने केवळ भिक मागवण्यासाठी चिमुरडीचं अपहरण केल्याचं तपासात उघड झालं आहे.
घटना अशी घडली
दिनांक २५ जुलै रोजी रात्री ९ वाजता ते २६ जुलैच्या पहाटे १.३० वाजेदरम्यान वंडरसिटी झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, कात्रज येथून धनसिंग हनुमंत काळे यांची दोन वर्षांची चिमुरडी झोपेतून अचानक गायब झाली. त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार भादंवि कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना गंभीर असल्याने आणि पीडितेचं वय लक्षात घेता पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांनी तात्काळ शोध मोहिम राबवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकं तयार करण्यात आली आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास सुरू झाला.
सीसीटीव्हीमधून मिळाला सुराग
कात्रज ते पुणे स्टेशनदरम्यानच्या १४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर दोन पुरुष आणि एक महिला एका दुचाकीवरून मुलीला घेऊन जाताना दिसले. पुणे रेल्वे स्टेशनवर आणखी दोन व्यक्ती त्यांच्या सोबत असल्याचे समोर आले. त्यांची ओळख पटवून गुप्त माहितीच्या आधारे या टोळीचा ठाव धाराशीव जिल्ह्यात असल्याचं निष्पन्न झालं.
तुळजापुरमध्ये धडक कारवाई
मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस आणि गुन्हे शाखेच्या दोन टीम्सनी तुळजापूरमध्ये धडक कारवाई करत, खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले:
- सुनिल सिताराम भोसले (वय ५१)
- शंकर उजान्या पवार (वय ५०)
- शालुबाई प्रकाश काळे (वय ४५)
तपासादरम्यान पीडित चिमुरडीही त्यांच्या ताब्यातून सुखरूप सापडली. पुढील तपासात मिळालेल्या माहितीनुसार इतर दोघांनाही अटक करण्यात आली:
- गणेश बाबू पवार (वय ३५)
- मंगल हरफुल काळे (वय १९)
भिक मागवण्यासाठी अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीचं अपहरण केवळ भीक मागवण्यासाठी केलं होतं. या प्रकरणात बीएनएस कायद्यानुसार कलम १३९ आणि ३(५) अंतर्गत गुन्ह्यात वाढ करण्यात आली असून, पाचही आरोपींना २ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सपोनि स्वप्निल पाटील करीत आहेत.
पोलीस दलाची तत्परता वाखाणण्याजोगी
या प्रकरणात पुणे पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तांत्रिक तपास कौशल्य कौतुकास्पद आहे. अवघ्या ७२ तासांत बालिकेची सुखरूप सुटका करून समाजासमोर पोलिसांचं उत्तरदायित्व अधोरेखित केलं आहे.