
पुणे – पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. समाजाचे प्रश्न आणि मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना दत्तामामा भरणे म्हणाले, “धनगर समाजाच्या अडचणी आणि मागण्या सोडवण्यासाठी हा प्रयत्न आहे. वाशिम, बीड, सांगली, सातारा अशा सर्व भागांमधून कार्यकर्ते येथे आले आहेत. दादांकडे जेव्हा प्रश्न मांडले जातात, तेव्हा त्यावर तोडगा निघतोच.”
सामाजिक आणि राजकीय टीकाकारांकडून अजित पवारांवर होणाऱ्या टिकेबाबत विचारल्यावर भरणे म्हणाले, “गाली देणाऱ्यांना आम्ही महत्त्व देत नाही. समाजात जो काम करतो, तोच पुढे जातो.”
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील चर्चांवर भरणे यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले, “हा विषय वरिष्ठांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, माझं बोलणं योग्य नाही.”
याशिवाय, ‘लाडकी बहिण’ या वक्तव्यावर झालेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. “माझं विधान चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. सरकारकडून कुठल्याही योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
विवादग्रस्त वक्तव्ये, मंत्र्यांचे विभाग बदल, आणि फोन टॅपिंगसारख्या आरोपांवरही भरणे यांनी भूमिका स्पष्ट केली. “माझा फोन कायम चालू असतो, कोणीही कॉल करू शकतो,” असं म्हणत त्यांनी रोहित पवारांच्या आरोपावरही प्रतिक्रिया दिली.