
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे बिबट्याला घाबरून रक्तदाब वाढून स्वीटी बागल या गरोदर महिलेचा पोटातील बाळासह झालेला दुर्दैवी मृत्यु हा माझ्या मुलीचा मृत्यू संशयास्पद असुन बिबट्याच्या भीतीचा खोटा बनाव केला असून सदर घटनेची सखोल चौकशी करण्याची महिलेच्या आईची मागणी
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे रात्रीच्या वेळी अंगणात बिबट्या पाहिला व घाबरून रक्तदाब वाढून नववा महिना सुरु असलेल्या गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल केले. स्वीटी अक्षय बागल (वय २७ वर्ष ) या महिलेची नऊ दिवस रुग्णालयात सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली पोटातील बाळासह महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला. नवरात्र सुरु असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी स्वीटी बागल यांच्या आई बबिता संजय टाव्हरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन माझ्या मुलीचा मृत्यू संशयास्पद असुन बिबट्याच्या भीतीचा खोटा बनाव केला असून सदर घटनेची सखोल चौकशी करून सासरच्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी आमरण उपोषणास बसणार असल्याचे बबिता टाव्हरे यांनी अर्जात म्हंटले आहे.
याबाबत माहिती देताना स्वीटी बागल यांचे पती अक्षय बागल म्हणाले माझी पत्नी स्वीटी हिला सध्या नववा महिना सुरू होता दि. २६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी घराबाहेर आली असता तिला बिबट्या दिसल्याने ती घाबरत ओरडत पळत घरात आली गरोदर असल्याने पळत घरात आल्याने तिला दम लागून तिचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तिला मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे त्यांचे तात्काळ सिजरिंग करावे लागेल त्यांना मंचर येथील खाजगी रुग्णालयात न्यावे असा सल्ला दिला. त्यावेळेस कुटुंबीयांनी स्वीटीला मंचर येथेच खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तात्काळ तिचे सिजरिंग केले असता पोटातच बाळ दगावले होते. स्वीटी बागल यांची परिस्थिती जास्त रक्तस्त्राव होत असल्याने गंभीर होत चालल्याने डॉक्टरांनी पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातील गर्भाशय पिशवी काढून टाकली. तरीही महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी सदर महिलेला इतरत्र हलवावे असा सल्ला दिला त्यानंतर दि.२८ सप्टेंबर ला सदर महिलेला पुणे येथे ससून रुग्णालयात हलवले असता तेथे उपचार सुरू असताना दि. ५ ऑक्टोंबर रोजी पहाटे स्वीटी बागल यांचा मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचार्यांनी बागल यांच्या घरी भेट देऊन पाहणी करून घटनेची माहिती घेतली आहे.
मयत स्वीटी बागल यांच्या आई बबिता संजय टाव्हरे यांनी काल बुधवारी मंचर पोलीस ठाण्यात अर्ज दिला असुन माझ्या मुलीला सासरी छळ होत होता. तिला सासरच्या लोकांनी मारहाण केल्याने तिची तब्बेत बिघडली त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वीटी बिबट्याला घाबरल्याचा बनाव केला आहे. त्यामुळे सदर घटनेची पोलिसांनी कसून चौकशी करून सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी आमरण उपोषणास बसणार असल्याचे बबिता टाव्हरे यांनी अर्जात म्हंटले आहे.