
पुणे –राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम, स्वागतयात्रा आणि शुभेच्छांचे फ्लेक्स झळकत आहेत. मात्र, पुण्यात लावण्यात आलेल्या एका खास फ्लेक्सने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष रुपेश संत यांनी पुणे महानगरपालिकेसमोर लावलेल्या भव्य फ्लेक्सवर थेट “आई तुळजाभवानी, ‘दादा’ना मुख्यमंत्रीपदावर लवकर विराजमान होऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना” असा उल्लेख आहे.
हा मजकूर जितका भावनिक, तितकाच राजकीयदृष्ट्या संकेत देणारा मानला जात असून, या फ्लेक्समुळे पुण्यात राजकीय चर्चांना चांगलाच जोर आला आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेचा थेट उल्लेख करणारा हा संदेश कार्यकर्त्यांच्या मनात दडलेली भावना उघडपणे मांडत असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्स, पण आशय मुख्यमंत्रिपदाच्या दिशेने!
या फ्लेक्समुळे अजित पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना नवा रंग मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा एक भावनिक संदेश आहे की योजनाबद्ध राजकीय व्यूहरचना, यावर वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, या फ्लेक्सवर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी, ‘पुणेकर कार्यकर्त्यांच्या मनातली भावना थेट तुळजाभवानीच्या चरणी व्यक्त करणारा हा संदेश, अजितदादांच्या नेतृत्वाची ताकद अधोरेखित करणारा’ असल्याचं अनेक ठिकाणी बोललं जातंय.