
बारामती शहरात बहुजन समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना एक निवेदन दिले. यामध्ये बारामती नुकत्याच झालेल्या अपघाताचा संदर्भ देत बारामतीत पुन्हा हायवा वाहतुकीला परवानगी दिल्यावरून टीकाख सोडले आहे.हायवा डंपर व मालकांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर आर्थिक लागेबांधे व राजकीय दबावामुळे दिवसा परवानगी दिल्यामुळे आता पुन्हा एकदा अपघाताची खात्री निर्माण झाली आहे.अशी टीका करत काळुरम चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की, खंडोबानगरच्या महात्मा फुले चौकात झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर बारामतीकरांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. प्रशासनाच्या विरोधात रस्ता रोको सारखी आंदोलने नागरिकांनी केली. त्यावरून नागरिकांच्या तीव्र भावनेची दखल घेत प्रशासनाने हायवा बाहतुकीला सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत निर्बंध घातले होते. त्यामुळे बारामतीकरांच्या मनामध्ये हायवा डंपर बाबत निर्माण झालेली भीती दूर झाली होती. परंतु पुन्हा एकदा हायवा डंपर बाहतुकीला परवानगी दिल्यामुळे आता बारामतीकरांचे मरण निश्चित झाले आहे. त्यामुळे आरटीओ व पोलीस विभागाने बारामतीकरांच्या मयताच्या सामानाची सुद्धा तरतूद करावी म्हणजे मरणानंतर मयतची शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान वरील दोन्ही विभाग सामानाची तयारी करण्यास असमर्थ ठरत असतील किंवा त्यांना आर्थिक अडचण असेल तर बहुजन समाज पार्टीतर्फे मोफत विनाशुल्क मयतीचे (अंत्यसंस्कार) सामान देण्यात येईल. बारामतीकरांच्या तीव्र भावनांची दखल घ्यावी व पुन्हा एकदा सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत वाहतुकीला बंदी घालावी अशी मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली आहे.