

सासवड- ” माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा बा पांडुरंगा ” हा अभंग होऊन सकाळी ठीक ११. ३० वाजता संत सोपानकाकांच्या पालखीची एक मंदिर प्रदक्षिणा होऊन पुर्वेकडील मुख्य दरवाजातून हा सोहळा बाहेर पडला. यावेळी हजरो भाविकांनी माउली व सोपानकाकांचा जयघोष केला. सासवडकर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली त्याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. टाळ – मृदुंगाच्या गजरात, ग्यानबा – तुकारामांच्या जय घोषात, भगव्या पताकांच्या गर्दीत, हजारो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे धाकटेबंधू संत सोपानकाका महाराजांच्या या पालखीचे आषाढवारीसाठी सोमवारी ( दि ३ ) सासवड वरून उत्साही वातावरणात पांगारे गावाकडे प्रस्थान झाले.
सोमवारी बारस व सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान दिन असल्याने मंदिरात पाहटे ४ वाजता काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर पाहाटे ५ पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. संत सोपानकाकांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मनाच्या दिंड्यांना मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व दिंडी प्रमुखांचे मानाचे अभंग संपन्न झाले. याच दरम्यान मानकरी आण्णासाहेब केंजळे महाराज, देवस्थानचे प्रमुख अॅड त्रिगुण गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून विणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका सहकारी बँक व सासवड नगरपालिका यांच्या वतीने सर्व दिंडी प्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार संजय जगताप उपस्थित होते. दरम्यान संत सोपानकाकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी मंदिरात पंढरपुर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर, त्रंबकेश्वर आदी ठीकानाच्या देवस्थानांचे प्रतिनिधी व दिंडी प्रमुख, ग्रामस्थ व हजारोंच्या संखेने भाविक उपस्थित होते. रथासाठी सोरटेवाडीच्या केंजळे परिवाराच्या बैल जोडीचा मान असून नितीन कुलकर्णी यांचा नगारावाहन आहे. स्व चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ देवस्थानला अर्पण केलेल्या अश्वासह अंजनगावचे परकाळे कुटुंबातील अश्व पालखीसमवेत मार्गक्रमण करीत आहेत. संत सोपानकाका बँकेच्या वतीने चांदीचा रथ, दररोजची फुलांची सजावट, पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, डॉक्टर व औषधे दरवर्षी देण्यात येतात. दुपारी १ च्या दरम्यान जेजुरी नाक्यावर ग्रामस्थ आणि हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचा पांगारे या गावी पहिला मुक्काम आहे.