
उत्तराखंडमध्ये अचानक भीषण पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असून, खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. उत्तरकाशीच्या धराली परिसरात परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. अनेक ठिकाणी संपर्क तुटला असून, काही लोक जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी भारतीय सैन्य युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.या पार्श्वभूमीवर, सोलापूरचे चार पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ओम साई ट्रॅव्हल्समार्फत हरिद्वारहून प्रवास करणारे धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोटे हे चार पर्यटक सध्या संपर्काबाहेर आहेत.
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून धीर दिला आहे. “जखमींच्या यादीत या चार नागरिकांची नावे नसल्याने ते सुखरूप असावेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच खासदार प्रणिती शिंदे या डेहराडून येथील स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून अडकलेल्या पर्यटकांविषयी माहिती मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. ढगफुटीमुळे केबल तुटल्याने थेट संपर्क साधण्यात अडथळा येत आहे, मात्र सोलापूरच्या खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचा या चार नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.