

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रविवार दि.20 जुलै 2025 रोजी सुशांत शांताराम आमले हा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नारायणगाव मधील शेवंताई सीएनजी पंपाजवळ असलेल्या आकाश पान शॉप या टपरीवर पान खाण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी ओम सुखदेव बर्डे, कुणाल चंद्रकांत कानडे आणि इतर एक आरोपी हे उधारीवर सिगरेट देत नाही म्हणून टपरीवाल्यासोबत भांडण करताना दिसल्यानंतर सुशांत शांताराम आमले यांनी ओम बर्डे याला भांडण कशाला करता असे म्हणण्याच्या कारणावरून वरील तीन आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून सुशांत आमले यांना गाडीवरून खाली पाडले व त्यांचे शर्टाचे बटन तोडून गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची चैन तसेच शर्टाच्या वरच्या खिशात असलेले साडेसात हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेऊन गेले व पोलीस कम्प्लेंट केल्यास तुला उद्याचा दिवस बघू देणार नाही अशी धमकी दिली.
अशा फिर्यादीवरून दिनांक 21 जुलै 2025 रोजी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला . सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई सत्यम केळकर, सोमनाथ डोके, दत्ता ढेंबरे, टीलेश जाधव यांनी तत्काळ आरोपी ओम सुखदेव बर्डे व कुणाल चंद्रकांत कानडे यांचा शोध घेऊन त्यांना 22 जुलै 2025 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून इतर एक आरोपी हा फरार झाला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पुणे ग्रामीण जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल , अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग श्री रवींद्र चौधरी तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील हे करत आहेत.