
पुणे – सिंहगड रोडवरील एकता नगर भागात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी याच भागात धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे पाणी शिरल्याची घटना घडली होती. सध्या धरण क्षेत्रात सलग दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
आज दुपारी एक वाजता खडकवासला धरणातून तब्बल 26 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकता नगर परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली असून, संभाव्य पुरस्थितीची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता मोड स्वीकारली असून, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान संपूर्ण तयारीसह तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांना नदीपात्राच्या आसपास न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अधिकृत सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.