बेकायदेशीरपणे एलपीजी गॅस भरताना आग लागल्याची चर्चा

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात ऐन उन्हाळ्यात ओमनी कारला आग लागल्याची घटना घडली आहे. मानवी वस्तीत या कारला आग लागल्याने मोठा धोका निर्माण झाला होता…लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतील आर्यन पंप्स या कंपनीच्या मदतीने तात्काळ ही आग आटोक्यात आणण्यात आली. जर ही आग भडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचं ठोस कारण समोर आलं नसलं तरी बेकायदेशीरपणे एका ओमनी व्हॅन मध्ये घरगुती वापराच्या एलपीजी टाकी मधून गॅस भरत असताना गॅसची गळती होऊन गाडीने पेट घेतल्याची जनतेमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पळसदेव गावात अनधिकृतरीत्या एलपीजी गॅस सिलिंडर मधून काढून मारुती व्हॅनमध्ये भरला जात होता. याचवेळी अचानकपणे गॅस लिक झाला आणि आग लागली. वाहनाने पेट घेतला आणि आग नियंत्रणाबाहेर गेली. त्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे..जर ही आग भडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता.