ऑलिम्पिक स्पर्धेच्यादृष्टीने सायकलपट्टूंकरिता ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ महत्त्वाची – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

पुणे, दि. २ (जिमाका वृत्तसेवा) : देशातील अधिकाधिक सायकलपट्टूंना ऑलिम्पिक स्पर्धेच्यादृष्टीने प्रोत्साहन देणे, सायकल चळवळ निर्माण करून आरोग्यसंपन्न जीवनशैली विकसित करणे, तसेच पर्यावरण संवर्धन व वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा असून जिल्ह्यातील सायकलपट्टू व सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध सायकलपट्टूंशी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह सायकलपट्टू उपस्थित होते.

‘बजाज पुणे ग्रँड टूर’बाबत सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, जिल्ह्यात एकूण चार टप्प्यांमध्ये १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे सायकलिंगला एक महत्त्वाचा खेळ म्हणून नवी ओळख मिळणार असून पुणे शहराची ‘सायकलिंग सिटी’ म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच देशातील प्रतिभावान सायकलपट्टूंचा शोध घेऊन त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा मानस आहे.

स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कामे करण्यात येत असून ती अंतिम टप्प्यात आहेत. जिल्ह्यातील सायकल स्पर्धेसाठी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) च्या मानांकनानुसार रस्त्यांचा विकास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सायकल स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सायकलपट्टूंचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून स्वयंसेवक किंवा प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सायकलपट्टू या नात्याने स्पर्धा नियोजनात काही उणिवा आढळल्यास त्या तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात. त्यावर प्रशासनाकडून तत्काळ व गतिमान कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेचे थेट प्रक्षेपण देश-विदेशात होणार असल्याने देशाची प्रतिमा व प्रतिष्ठा उंचावणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीदरम्यान सायकल स्पर्धेच्या दृष्टीने जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विकसित करण्यात येत असल्याबाबत सायकलपट्टूंनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Leave a Comment

You cannot copy content of this page