
पुणे, १२ जून: कात्रजमधील सुखसागर नगर परिसरात यशश्री सोसायटीसमोर एका भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा श्रेया गौतम येवले (वय २१ वर्षे, रा. शीतल हाइट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा, पुणे) ही तरुणी पायी जात होती.
एम.एच. १२ यू.एम. ४८४७ या क्रमांकाच्या टुरिस्ट वेगन-आर कारने तिला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनुसार, कारचालकाने मुख्य रस्त्यावरून नियंत्रण गमावले आणि गाडी थेट फुटपाथवर चढवली. यामध्ये एक झाड आणि त्यानंतर श्रेयाला जोरदार धडक बसली. धडक इतकी तीव्र होती की श्रेयाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७, रा. गोकुळ नगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या दत्तात्रय गाडेकर (रा. गोकुळ नगर) या दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.