
दौंड, ता. १४ : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात असणाऱ्या महसूल विभागाच्या दोन महाभाग ठगाणी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत अमाप माया गोळा करून गोर-गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ज्या नोंदी वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या, त्या नोंदी या दोन महाशयानी आपल्या तल्लख बुद्धीचा पुरेपूर वापर करून खोट्याचे खरे करून नोंदविल्या आहेत.
वाखारी ता.दौंड येथील शेतकऱ्यांचे शेतजमीन वर्ग २ चे क्षेत्र हे आम्ही वर्ग १ करून देतो,त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला तुम्ही तुमचे हक्क कुलमुखत्यार पत्राद्वारे स्वाधीन करा, असे उरुळीकांचन येथील जमीन खरेदी विक्री मधील गुंठा मंत्री म्हणून प्रचलित असलेल्या व्यक्तीने तेथील शेतकऱ्यांचा मजबुरीचा फायदा घेत त्यांच्या जमिनी आपल्या परिवाराच्या नावे करून नवीन सात बारा तयार केला असल्याची ही घटना घडली आहे.
पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व नियमाच्या अधीन राहून तीन महिन्याच्या आत हे दस्तऐवज पूर्ण करून देण्यात यावेत,असे त्या आदेशात नमूद करण्यात आले होते,परंतु त्यांनी आपली हुशारी वापरून हे दस्तऐवज पूर्ण करून घेतले व नोंदीसाठी महसूल विभागाकडे दाखल केले. ही नियमबाह्य नोंद असल्याने १३ वर्ष ही नोंद कोणत्याही अधिकाऱ्यांनी धरली नाही.
परंतु येथील महसूल च्या काळू-बाळू यांनी आर्थिक मलाई आपल्याला चाखायला मिळणार म्हटले की, मागचे-पुढचे काहीही न पाहता, पूर्वीचे शेतकरी यांना भूमिहीन करून त्या उरुळी कांचन च्य गुंठा मंत्र्याला वाखारी चा शेतकरी करून मोकळे झाले.
केडगाव परिसरातील या काळू -बाळू महसूल च्या अधिकार्यानी अनेक शेतकऱ्यांना भूमीहीन केले आहे. गोर गरीब शेतकऱ्यांचा अडाणीपणाचा फायदा घेत पुण्यातील टाय, बूट, सुटातील पैशाची मस्तवाल लोकांनापाठीशी घालून आपली तिजोरी भरली आहे. यांच्या कार्यकाळात झालेल्या नोंदीची सर्व चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस चे स्वयंरोजगार-रोजगार सेल पुणे जिल्हाध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी दौंड तहसीलदार, प्रांत अधिकारी व इतर विभागास तक्रारी अर्ज देऊन यांची पोलखोल केली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी यावर काय कारवाई करणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. ठोस कारवाई न झाल्यास मुंबई मंत्रालयासमोर येत्या १५ दिवसात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.