कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंद; नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद !

Photo of author

By Sandhya

पुणे : वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खडग’ या नाटकाच्या सादरीकरणावर वंचित बहुजन आघाडी पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेत जोरदार आंदोलन केले. नाटकात जगाला शांती, करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा अपमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचितकडून करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या भूमिकेत स्पष्ट म्हटले आहे की, महाराष्ट्रात सावरकर नाही, फुले-शाहू-आंबेडकर चालणार. सावरकरांनी विकृतपणे लिहिलेले हे नाटक गौतम बुद्धांबद्दल अपमानास्पद संवादांनी भरलेले असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे म्हणत वंचित बहुजन युवा आघाडीचे शहरअध्यक्ष सागर आल्हाट यांनी नाटक बंद पाडले.

नाटकातील संवादात तथागत बुद्धांविषयी, भिक्कु संघ आणि बुद्ध तत्वज्ञान विषयी अतिशय आपत्तीजनक आणि अवमानकारक संवाद असल्याने हे नाटक महाराष्ट्रात कुठेही सादर होऊ देणार नाही, असा इशारा वंचितने दिला आहे. त्यांनी चेतावणी दिली की, जर हे नाटक परत आणण्याचा प्रयत्न झाला, तर नाटकातील कलाकार, दिग्दर्शक आणि पाहणाऱ्यांनाही दणका देण्यात येईल. वंचित बहुजन आघाडी हे नाटक कुठेही होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवावे.

वंचितने यामागे भाजपा व आरएसएसची मिलीभगत असल्याचाही आरोप केला आहे. त्यांच्या इशाऱ्यावरून हे जुने नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचा कट असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कोथरूड परिसरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नाटक अखेर बंद करण्यात आले आहे. नाटकाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page