कोल्हापूरमधील ‘ईव्हीएम स्ट्राँग रूम’ बाहेरील सीसीटीव्ही हटवल्याप्रकरणी सखोल चौकशी होणार

Photo of author

By Sandhya


– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सरकारने घेतली गंभीर दखल

नागपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पेठ-वडगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे हटवल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन बुधवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता.

सतेज पाटील म्हणाले, “सामान्य नागरिकाला आपल्या घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचा मूलभूत अधिकार आहे, मग ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे पोलीस किंवा प्रशासनाला काढण्याचा अधिकार कोणी दिला?” स्ट्राँग रूमचा परिसर पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये असायला हवा असताना उलट कॅमेरे हटवले गेल्याने हा परिसर ‘ब्लाइंड झोन’मध्ये गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या कृत्यामागे हेतूपुरस्सर कट असल्याचा संशय व्यक्त करत पाटील यांनी कॅमेरे हटवणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई आणि सर्व कॅमेरे पुन्हा बसवण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

या आरोपांवर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात स्पष्ट केले की, “सरकारने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्यामागील सर्व परिस्थितीची सविस्तर चौकशी केली जाईल. प्रशासनाने कायदेशीर अधिकारांच्या मर्यादेत राहूनच काम करावे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पूर्णपणे पारदर्शक राहील याची दक्षता घेतली जाईल. सरकार या घटनेवरील शंका दूर करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, असे ते म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page