
पुणे – गंगाधम रोड ते खडी मशीन मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्वामी विवेकानंद गार्डनजवळ एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या परिसरात मागील काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी याच दुभाजकाला एक स्विफ्ट कार धडकली होती, त्यामध्ये एक महिला जखमी झाली होती.
गंगाधम ते खडी मशीन मार्ग हा एक प्रमुख मार्ग असून, याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या मार्गालगत शाळा, रहिवासी वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक अधिक काळजीपूर्वक नियोजित करण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या मार्गावर अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. रस्त्याचे योग्य नियोजन, स्पीड ब्रेकर, सिग्नल यंत्रणा, व दुभाजकांचे सुधारणा कामे लवकरात लवकर करण्यात यावीत.