

जेजुरी वार्ताहर दिनांक 29 पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जेजुरी नगरपरिषद प्रशासनाने विशेष योजना आखली आहे. शहरात कृत्रिम विसर्जन हौद व निर्माल्य कलशांची सोय करण्यात आली आहे.सर्व गणेश भक्तांनी कृत्रिम हौदा विसर्जन करावे असे आवाहन जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी केले आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नागरिकांना पर्यावरणाला साथ देत उत्सव पार पाडण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. गणेश उत्सव काळात शहरातील सर्व गणेश भक्तांनी घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन थेट विहिर, तलाव अथवा धरणामध्ये न करता नगरपरिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन हौदामध्ये करावे, तसेच इच्छुकांनी घरी पूजेनंतर श्रींच्या मुर्ती नगरपरिषद कार्यालय येथे दान केंद्रात द्याव्यात. नागरिकांनी गणेश उत्सव काळात नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करून पर्यावरण पूरक पध्दतीने गणेश विसर्जन करावे. असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात होळकर तलाव, दहाव्याचे पटांगण, फकीराची बारव या तीन ठिकाणी विसर्जन हौद व निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय भक्तांनी पूजेतुन निर्माण झालेली फुले, नारळ व इतर पूजा सामग्री विहिर किंवा तलावामध्ये न टाकता नगरपरिषदेने शहरात उभारलेल्या निर्माल्य कलशामध्ये जमा करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.