गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेल्या “कृष्ण मुरारी” गाण्याने पार केला ५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा!

Photo of author

By Sandhya

आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, गौतमी पाटीलच्या नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे शिवाय या गाण्याचे ५ मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहेत. या गाण्यात ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत असून श्री कृष्णाची आराधना करताना दिसत आहे. या गाण्यावर अनेक लोकांनी सुंदर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात एका आईचा आणि तिच्या लहान मुलाचा सुंदर व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. तर एका आजोबांचा गाण गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत आहे. तसेच अनेक गावागावांत, ऑर्केस्ट्राजमध्ये कलाकार हे गाणं सादर करत आहेत. नृत्यांगना सायली पाटीलने ही या गाण्यावर नृत्य केले आहे.

“कृष्ण मुरारी” या गाण्याचे निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. कृष्ण मुरारी या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले आहे. परंतु हे गाणं पाहताना वृंदावनात असल्याचा भास होतो.

गौतमी तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी व गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. त्यामुळे मी साईरत्न एंटरटेन्मेंट आणि निर्माते संदेश गाडेकर व सुरेश गाडेकर यांचे मनापासून आभार मानते. माझी कृष्णावर नितांत श्रद्धा आहे. मी दररोज कृष्णाची भक्तीभावाने आराधना करते. हे गाणं चित्रीत करताना मला खूप मज्जा आली. मला खूप सुंदर कमेंट्स येत आहेत हे पाहून अस वाटतंय प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे. नुकतेच या गाण्याचे ५ मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले त्यामुळे मला खूप भारी वाटत आहे. माझ्यावर प्रेक्षकांचे असेच प्रेम कायम राहो हीच सदिच्छा!.”

Leave a Comment