
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात येऊन विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.असे अभिनव उपक्रम महाविद्यालयांनी राबवावेत असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात’ डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके (ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, तसेच विभागातील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. डिजिटल रीडिंग झोनमुळे वाचन संस्कृतीला मोठी चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त माहिती सहज उपलब्ध होईल.
या उपक्रमात जागतिक दर्जाच्या नामांकित अशा १० हजारपेक्षा अधिक जर्नल्सचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना कुठेही, कधीही अभ्यासाची सोय, ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यास सामग्री, चालू घडामोडी, जनरल स्टडीज साहित्य आणि परीक्षा निहाय वर्गीकृत माहिती प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.