
दमदार पावसामुळे चाकण परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पडलेले धोकादायक खड्डे, चिखलामुळे चाकणकर नागरिकांचा श्वास गुदमरला आहे. हमरस्त्यासह परिसरात तर सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हम रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी कसलीच व्यवस्था नसल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचते. वाढत्या बांधकामामुळे अनेक ओढे, नाले अरुंद झाले व काही ठिकाणी हे नाले अदृश्यही झाले आहे. चाकण शहरात अनेक ठिकाणी व अनेक भागात जीव घेणे खड्डे पडून पाणी साचले आहे. तर अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधून पाणी साचले.
नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर पाणी, खड्डे व चिखल सर्वत्र आहे. चाकण येथील आंबेठाण चौक व तळेगाव चौकात उड्डाणपूलाखाली खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
” दमदार पावसामुळे चाकण मधील रस्ते खड्डेमय आणि चिखलाने माखून निसरडे झाले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.