
पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चाकण आळंदी घाटात झालेल्या विचित्र अपघातात नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चाकण गावच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, चाकण पोलिसांनी याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
ज्ञानोबा तुळशीराम मुळे (वय – ४०, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप (एम एच १४-८९७२) या वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, फिर्यादी ज्ञानोबा मुळे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह स्वामी समर्थांचे दर्शन करून दुचाकीवरून आळंदीकडे येत होते. चाकण आळंदी घाटात रोटाई माता मंदिराच्या पुढे शंभर मीटर अंतरावर पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी मुळे, त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले. तसेच नऊ महिन्यांच्या बाळाचा धक्कादायक मृत्यू झाला.
वाहनचालक घटनास्थळी न थांबता तसाच पुढे पसार झाला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.