भरधाव वाहनाने आजोबासह नातवाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. चाकण - आंबेठाण रस्त्यावर दावडमळा हद्दीत शनिवारी हा अपघात झाला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुरलीधर लखुबा लाड (वय - ५५, रा. दावडमळा, चाकण ) व त्यांचा दोन वर्षांचा नातू अद्वैत रवींद्र शिवलीकर असे या अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे. लाड यांचे जावई रवींद्र बाळकृष्ण शिवलीकर (वय - २८ ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुरलीधर लाड हे शनिवारी आपला नातू अद्वैत यास घेऊन सौंदर्य सोसायटीच्या कमानी समोरील रस्त्याने जात होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातात या निष्पाप दोघांचे नाहक बळी गेले आहेत.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.