चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरावस्था

Photo of author

By Sandhya

निष्पाप नागरिकांचे जाताहेत नाहक बळी

      उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून चाकण एमआयडीसीत कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या दुरावस्थेने रस्ते कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. 

      खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील चाकण –  आंबेठाण रस्त्यावर वाघजाई नगर कॉर्नर, मुळे वस्ती व ठिकठिकाणी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने प्रवाशी व नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. मृत्यूचे सापळे बनलेले हे रस्ते अपघाताला आपोआप निमंत्रण देत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड पट्ट्या खचलेल्या आहेत. झुडपे वाढल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.

     बिरदवडी, आंबेठाण व फडके वस्ती येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असुन वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. वाहन चालक पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात निष्पाप लोकांचे नाहक बळी घेत आहेत. रस्त्यावर अपघात वाढले आहेत. अनेक नागरिक व शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. वाहतुकीचा वेग प्रचंड असल्याने दररोज एक ना एक अपघात घडत आहे. या रस्त्यावर गतिरोधक व नाम फलकाचा अभाव आहे.

      आवश्यक आणि वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. चाकण – आंबेठाण रस्त्यावरील फडके वस्ती येथे बस स्टॉप शेड बांधणे अपेक्षित आहे. मुळे वस्ती ते ज्योतिबा मंदिर बिरदवडी येथे रस्त्यालगत असणारा नैसर्गिक ओढा वाहतुकीस त्रासदायक बनला आहे. या ठिकाणी ड्रेनेज लाईन, बंदिस्त गटार योजना केल्यास अधिक सोयीचे होईल. दवणे वस्ती व आसपासच्या परिसरात अरुंद रस्त्यालागत साईड पट्ट्या भरल्या नसल्याने अपघात वाढले आहेत. या भागात तातडीने संरक्षक भिंत व गरजेच्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी येथील युवक नेते शैलेश फडके यांनी केली आहे.
 ” अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी नामफलक व गतिरोधक उभारण्याची गरज आहे. मूलभूत व कोलमडलेल्या पायाभूत सुविधा मार्गी लावणे अपेक्षित वाटते. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करूनही रस्ते कंपनी व बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहेत. निव्वळ विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोकोपयोगी कामांकडे लक्ष देणे हिताचे वाटते.” –

Leave a Comment