

वाहतूक कोंडीने चाकणकरांचा श्वास अक्षरशः गुदमरला असून, वाहतुकीतून सुटका व्हावी यासाठी संतप्त नागरिक आक्रमक झाले आहेत. येथे चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले दोन्ही उड्डाणपूल पाडून गरजेच्या ठिकाणी नवीन उड्डाणपूलाचे काम त्वरित चालू न केल्यास पवना धरणग्रस्त जमीन बचाव कृती समितीचे अध्यक्ष व माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे हे येत्या ४ नोव्हेंबर पासून येथील तळेगाव चौकात आमरण उपोषणास बसणार आहेत.
ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम व भामचंद्र डोंगर या तीर्थक्षेत्राच्या कुशीमध्ये वसलेली आशिया खंडातील एक नंबरची औद्योगिक वसाहत चाकण पंचक्रोशीत आहे. या वसाहतीत मोठे कारखाने व उद्योगधंदे आहेत. या उद्योग धंद्यातूनच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या एकवीस वर्षांपूर्वी येथे चुकीच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. रोजच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे सर्वांनाच त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाढती वाहतूक कोंडी, प्रशासनाचा निष्काळजीपणा, अपुरे रस्ते, रस्त्यावर साचणारे सांडपाणी, अतिक्रमण, अवैध वाहतूक, शिस्तीचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कामाला जाणाऱ्या कामगारांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही.
रुग्णांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात अडचणी येत आहेत. वाहतूक कोंडीमुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले असून चाकणकर नागरिक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. चाकण मधील उड्डाणपुलाचे काम लवकरच मार्गी लावू, अशी पोकळ आश्वासने प्रशासनाकडून मिळत असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पंधरा वर्षे निघून गेली. मावळ तालुक्यातील सुदुंबरे ते खेड तालुक्यातील रासे फाटा या रस्त्यावरील उड्डाण पूलाच्या अनेकदा निविदा निघाल्या. काम चालू होणार आहे, कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे. निधी मंजूर केला आहे. अशा अनेक हुलकावण्या देऊन चाकण एमआयडीसीतील आणि पुणे जिल्ह्यातील करोडो जनतेला वेठीस धरले जात आहे. केवळ फसवी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली जात आहे. पुणे – नाशिक महामार्गावरील आळंदी फाटा ते वाकी खुर्द व मुंबई – नगर या महामार्गावरील सुदुंबरे ते रासे फाटा या दरम्यान उड्डाणपुलाची गरज आहे.
नित्याच्या वाहतूक कोंडीला कंटाळून अखेर चाकणकर नागरिकांच्या वतीने येथील उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे हे येत्या ४ नोव्हेंबर पासून चाकण येथील तळेगाव चौकात आमरण उपोषणास बसणार आहेत.