
पुणे-बेंगळुरू महामार्गावर फिर्यादीस चारचाकी वाहनात बसवून लोखंडी हत्याराने धमकावून मोबाईल, रोख रक्कम व दागिने असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरल्यानंतर फरार झालेल्या दोन आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक करून मोठे यश मिळवले आहे. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी व मुद्देमाल असा एकूण ४ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
घटनाक्रम :
दि. ३० मे २०२५ रोजी, फिर्यादी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वडगाव बु. येथील व्हिआरएल ट्रॅव्हल्समध्ये कोल्हापूरसाठी लाल रंगाच्या चारचाकीत बसले होते. नवले ब्रिज पार करताच गाडीत उपस्थित चार अज्ञात इसमांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी आणि लोखंडी हत्याराच्या मुठीने मारहाण केली. त्यांना धमकावून मोबाईल, रोख रक्कम व दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २७३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४)(६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची कसून चौकशी व अटकेची कारवाई :
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने नवले ब्रिजवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती गोळा केली. या वेळी अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे आणि निलेश भोरडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपींपैकी एकजण भूमकर चौकाजवळ थांबलेला आहे. त्वरित कारवाई करत पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले आणि त्याने आपले नाव निखील अरविंद पवार (वय २७) असल्याचे सांगितले.
याच्याच माहितीवरून दुसरा आरोपी रोहन शाम पवार (वय २७) याला न-हे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दोघा आरोपींना दि. २६ जून २०२५ रोजी अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली हुंडाई आय-२० कार (किंमत ₹४ लाख) आणि मोबाईल (किंमत ₹३० हजार) असा एकूण ₹४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दाईंगडे आणि पोनि (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संतोष भांडवलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
या पथकात अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतीश मोरे, संदीप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर आणि शिरीष गावडे यांचा समावेश होता.