



समर्थ पोलिसांची झडप – मौजमजेसाठी दुकानफोड करणाऱ्या टोळीला अटक
पुणे | प्रतिनिधी
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत कबीर चौक येथील ‘शार्प कलर’ या दुकानात चोरी करून फरार झालेल्या चार चोरट्यांना केवळ चार तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सर्वांनी “मौजमजेसाठी” चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपींकडून १५,५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दुचाकीवर आलेल्या या चोरट्यांनी ५ जुलै रोजी रात्री ११.५० ते ६ जुलै सकाळी ८.०० दरम्यान दुकानाचे शटर वाकवून आणि कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवरमधून रोख रक्कम चोरून नेली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा रजि. नं. १५०/२०२५ प्रमाणे भारतीय न्यायसंहिता-2023 च्या कलम 305(अ), 331(3), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CCTV व गुप्त बातमीदारीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोच
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केले आणि गोपनीय माहितीच्या आधारे चौघांना अटक केली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
- सुजल राजन परदेशी (वय 20, रा. प्रतापगड, उ.प्र. – सध्या मंगळवार पेठ, पुणे)
- सुभाष राजेश सरोज (वय 21, रा. प्रतापगड, उ.प्र. – सध्या मंगळवार पेठ, पुणे)
- नितीन दिलीप सरोज (वय 22, रा. रायपूर, उ.प्र. – सध्या मंगळवार पेठ, पुणे)
- रोहित मुन्नालाल सरोज (वय 22, रा. प्रतापगड, उ.प्र. – सध्या मंगळवार पेठ, पुणे)
या चौघांनी एकत्र येत चोरी केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कारवाई
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उप आयुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व गुन्हे निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात पीएसआय जालिंदर फडतरे, अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, औचरे, शिवा कांबळे, भाग्येश यादव, पागार यांचा सहभाग होता.