जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत

Photo of author

By Sandhya

बारामती दि. २५: ‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’….रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी… अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले.

मौजे खराडेवाडी येथे प्रशासनाच्यावतीने उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव सचिन यादव, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, बारामतीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
बारामती तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उंडवडी गवळ्याची व बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी आहे. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासन, बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे.

जर्मन हँगर पद्धतीचे मंडप, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, फिरते वैद्यकीय पथके, मोफत औषधोपचार, चरणसेवा, हिरकणी कक्ष, निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फिरते सुलभ शौचालय, कचरा वाहतूक घंटागाडी, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page